मोहोळ (प्रतिनिधी) : वैद्यकीय शारीरिक तंदुरुस्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेलेल्या एका पिढीतेशी तपासणीदरम्यान अश्लील वर्तन केल्याचा आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पिढीतेने मोहोळ पोलिस ठाण्यात डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २१ जून रोजी मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे घडली. पीडितेच्या तक्रारीनुसार, वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी करताना मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील शिरापुरसो येथे असलेल्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पीडिता वैद्यकीय शारीरिक तंदुरुस्त प्रमाणपत्र आणण्यासाठी दि. २१ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर अमित रमेश गायकवाड वय ४२ रा. शिरापुर ता. मोहोळ याने संबंधित पीडितेची हातातील स्टेथोस्कोपने तपासणी करत असताना त्या पीडीतेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. संबंधित पीडितेने यासंदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात त्या डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे .
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्णेवाड करत आहेत.पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरला गेट उघडायला लावून मोहोळ पोलीस ठाण्यात आणले. या घटनेमुळे मात्र मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा शिरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेत आले आहे.







