शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : साईबाबा संस्थानच्या सहकार्याने व साईबाबा पालखी सोहळा समिती शिर्डी यांच्या वतीने शिर्डी व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागाने महामंडलेश्वर स्वामी काशीकानंद महाराज परमहंस यांच्या मार्गदर्शनाने श्रीक्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र पंढरपूर साईबाबा पालखी पायी दिंडी सोहळ्याचे उद्या शनिवार दि. २१ जून रोजी दुपारी १ वाजता साई शताब्दी मंडप साईबाबा मंदिर येथून प्रस्थान होणार आहे.
पालखी सोहळा राहाता येथे मुक्कामी राहील. २२ जून रोजी पालखी सोहळा पुढील वाटचाल करत कोल्हार येथे मुक्काम, २३ जून राहुरी, २४ जून विळदघाट, २५ जून अहिल्यानगर, २६ जून रुईछत्तीशी, २७ जून मिरजगाव, २८ जून निमगाव धाकू, २९ जून करमाळा, ३० जून जेऊर, १ जुलै टेंभुर्णी, २ जुलै नरसिंहपूर, ३ जुलै जांबुड, ४ जुलै बंडी शेगाव, ५ जुलै पंढरपूर येथे मुक्कामी थांबणार आहे. या सोहळ्याची सांगता ७ जुलै रोजी पंढरपूर येथे काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान समयी भाविकांनी साई शताब्दी मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच या सोहळ्यामध्ये शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या साईसेवेचा व भक्तीचा आनंद घ्यावा, असे आवाहन साईबाबा पालखी सोहळ्याचे अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद महाराज परमहंस यांनी केले आहे.







