जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहरातील गर्दीच्या भागांमध्ये वारंवार खिसे कापून होणाऱ्या चोरींच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अमरावती येथील तीन खिसेकापू चोरट्यांना बसस्थानक परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून पाच लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २५ जून रोजी पोलीस हवालदार प्रविण भालेराव व अक्रम शेख यांना अमरावती येथील खिसेकापू टोळी जळगाव बसस्थानकात आल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तत्काळ बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग सुरू केले.
पथकाने बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असताना गर्दीत संधी साधून फिरणाऱ्या अहमद बेग कादर बेग (६२), रा. मुजफ्फरपुरा, नागपुरी गेट, अमरावती, हफिज शाह हबीब शाह (४९), रा. बलगाव, सकीनगर, अमरावती, अजहर हुसेन हफर हुसेन (४९), रा. रहमत नगर, अमरावती या तिघांना जेरबंद केले. चौकशीदरम्यान त्यांनी २४ जून रोजी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून दोन बंडलमध्ये एकूण ₹२००० चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींची अंगझडती घेतली असता ₹३३,८३०/- रोख रक्कम, ₹१७,५००/- किंमतीचे ५ मोबाईल, ०१ रेक्झिन बॅग, ₹५,००,०००/- किंमतीची टाटा इंडिका व्हिस्टा कार असा एकूण ५,५१,५३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १६१/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात आहेत. विशेष बाब म्हणजे आरोपी अहमद बेग कादर बेग याच्यावर अमरावतीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये याआधीही चार गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हा सवयीचा गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः बस स्थानक, रेल्वे स्थानक व इतर सार्वजनिक वाहतूक स्थळांवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास टोल फ्री क्रमांक 112 वर तात्काळ माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
ही संपूर्ण कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी, संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोउनि. शरद बागल, पोहेका सुनील दामोदरे, पोहेकॉ अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, पोना किशोर पाटील, पोकॉ रविंद्र कापडणे यांनी यशस्वी केली आहे.







