भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) : येथील रेल्वेस्थानकावरून विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना धमकावतून त्यांच्याकडून कॅश तसेच ऑनलाईन रक्कम लुबाडणार्या आठ किन्नरांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने जेरबंद केले आहे.
हे किन्नर रेल्वेतील परप्रांतीय प्रवाशांना टार्गेट करीत धमकावत होते शिवाय कॅश नाही म्हणणार्या प्रवाशांना स्कॅनर पुढे करीत शंभर ते दोनशे रुपयांची रक्कम जबरदस्तीने वसुल करीत होते. आरोपींच्या फोन पे रेकॉर्डमध्ये अनेक ट्रान्झेक्शन अशा पद्धत्तीने आढळले आहेत. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आणि रेल्वे हेल्पलाईनवर याची तक्रार केली होती.
रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के.एन. राय (क्राईम ब्रांच) आणि निरीक्षक पी.आर. मीना यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने बुधवारी व गुरुवारी रात्री भुसावळ मार्गावरील गाड्यांमध्ये धडक कारवाई करीत सहा किन्नर आणि त्यांच्या दोन मुख्य चालकांना रंगेहाथ पकडले. गुरुवारी भुसावळ न्यायालयात चार किन्नर आणि त्यांच्या दोन चालकांना हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना एक महिन्याची शिक्षा सुनावली. संशयीतांना जळगाव कारागृहात हलवण्यात आले आहे.







