तरुणाला लुबाडणार्‍या दोघा चोरट्यांना सिंहगड रोड पोलिसांनी केले जेरबंद

arrest
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : देहुरोड – कात्रज महामार्गावर तरुणाला प्रवासी म्हणून घेऊन मारहाण करुन त्याला लुबाडणार्‍या दोघा चोरट्यांना सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केले आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, स्वरुप अरुण कदम (वय २५, रा़ नर्‍हेगाव) यांना कोल्हापूरला जायचे होते. ते महामार्गावर थांबले होते. देहुरोडवरुन एक कार आली. त्यांनी तिला हात दाखवून प्रवासी म्हणून कारमध्ये बसले. नवले पुलाच्या पुढे गेल्यावर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल, कानातील सोन्याची बाळी, चांदीची अंगठी असा ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन त्यांना महामार्गावरील ससेवाडी येथे कारमधून ढकलून देऊन पळून गेले होते. याबाबत स्वरुप अरुण कदम (वय २५, रा़ नर्‍हेगाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीस अंमलदार देवा चव्हाण,सागर शेडगे व निलेश भोरडे यांना बातमीदाराने बातमी दिली की, भुमकर चौकात या गुन्ह्यातील संशयित थांबला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नवले पुलाच्या महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे निखिल अरविंद पवार (वय २७, रा. मातोश्री अपार्टमेंट, वेताळनगर, आंबेगाव) आणि रोहन शाम पवार (वय २७, रा. जाधवर कॉलेजसमोर, पाटील बिल्डिंग, नर्‍हे) या दोघांनी ही चोरी यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने निखिल पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत त्याने रोहन पवारच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यावरुन पोलिसांनी रोहन पवार याला पकडले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, निलेश भोरडे, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतीश मोरे, संदिप कांबळे, तानाजी सागर, समीर माळवदकर, शिरीष गावडे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here