पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : कॅम्पमधील साचापीर स्ट्रीट येथील मेहेर अपार्टमेंटसमोर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅबची एक बाजू कोसळल्याने त्यात एका कामगाराचा मृत्यु झाला असून तीन कामगार जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी २ वाजता घडली.
शुभंकर जधबा मंडल (वय २१, रा. दक्षिण परगाणा, पश्चिम बंगाल) असे मृत्युमुखी झालेल्या कामगाराचे नाव आहे. चेन्नि मंगल मुखर्जी (वय २१, रा. कोलकत्ता), वरुन (वय ३५, रा. कोलकत्ता), संन्याशी बघदी (वय २८, रा. कोलकत्ता) अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
साचापीर स्ट्रिट येथील मेहेर अपार्टमेंटच्या समोर मेहता यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु होते. या इमारतीच्या बांधकामाचा चौथ्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात आला होता. स्लॅबला लावलेला सांगाडा काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी स्लॅबच्या बाहेरील बाजूचा सांगाडा कोसळला. त्यात तेथे काम करणारे हे चारही कामगार त्या सांगाड्याबरोबर खाली आले. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी यातील जखमींना बाहेर काढून तातडीने ससून रुग्णालय पाठविले होते. तेथे उपचार करण्यापूर्वी शुंभकर मंडल याचा मृत्यु झाला. अन्य तिघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी सांगितले.







