चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – स्वच्छ सर्वेक्षण-2020 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून चोपडा नगरपरिषदेने देशातील पश्चिम विभागात (महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्येप्रदेश, राजस्थान) 51 वा व महाराष्ट्र राज्यात 31 वा क्रमांक मिळवला आहे.चोपडा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण-2020 अंतर्गत 14 व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधिद्वारा फिरते शौचालय, व्हॅक्युम एमटीअर मशिन,मैला व्यवस्थापन प्रकल्प,शहरातील संकलीत कचरा प्रक्रिया करणेकामी आवश्यक स्क्रिनिंग मशिन,प्लास्टीक बेलिंग मशिन, सिंगल शाफ्ट श्रेडर मशिन, जे.सी.बी. मशिन,ओला व सुका कचरा विलगीकृत रित्या संकलन करणेकामी 2 नवीन घंटा गाडी खरेदी इ. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेकरीता पुरक कामे केली. सदर कामामुळे चोपडा शहरातील सार्वजनिक आरोग्य,स्वच्छता, मैला व्यवस्थापन,कचरा संकलन वाहतूक व प्रक्रिया इ. करीता क्षमता बांधणीस मदत झाली. चोपडा नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभाग असून चोपडा नगरपरिषदेने देशाच्या पश्चिम विभागात स्वच्छ सर्वेक्षण-2018 मध्ये 69 वा क्रमांक,स्वच्छ सर्वेक्षण-2019 मध्ये 416 वा क्रमांक मिळविला होता.तसेच चोपडा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण-2020 च्या प्रथम सत्रात 79 वा क्रमांक व द्वितीय सत्रात 43 वा क्रमांक मिळवून उत्तम कामगिरी केली आहे.सदर कामगिरीमध्ये चोपडा शहरातील नागरिकांचा सक्रिय सहभाग असून त्यांचे देखील यात महत्वाचे योगदान आहे.तसेच चोपडा नगर परिषद समस्त कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांचे यात बहुमूल्य असे योगदान आहे. शहरातील जागरुक नागरिकांच्या मदतीनेच कचरामुक्त चोपडा शहराचे ध्येय साध्य होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लवकरच आटोक्यात येईल या आत्मविश्वासाने चोपडा नगरपरिषदेने मिशन स्वच्छ सर्वेक्षण-2021 हाती घेतले असून मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीही चोपडा शहरातील तमाम नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ व सुंदर चोपडा शहराचे स्वप्न साकार होईल.
चोपडा नगरपरिषदेच्या यशाबद्दल सर्व कर्मचारी, अधिकारी सर्व सन्माननिया सदस्य व समस्त नागरिक यांचे नगराध्यक्षा सौ.मनिषा चौधरी, उपनगराध्यक्ष श्री.भूपेंद्रभाई गुजराथी व मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी हार्दिक अभिनंदन करत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.







