जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : शहरातील मेहरूण तलाव परिसरात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उधडकीस आली आहे. गुरुवारी सकाळपासून गायब असलेल्या या तरुणाचा मृतदेह सायंकाळी सातच्या सुमारास तलावात तरंगताना आढळून आला.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, शहरातील एका झेरॉक्स दुकानात काम करणारा विनय अशोक देशमुख (वय २९, रा. मोहन नगर, जळगाव) हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्याचे वडील अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे विनय घरातून निघाला. मात्र, संपूर्ण दिवसभर त्याचा काहीही पत्ता लागला नाही. तो दुकानातही गेला नव्हता. नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता, त्याची दुचाकी मेहरूण तलाव परिसरात आढळून आली.
दुचाकी आढळल्यानंतर विनयने आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांना आला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. तलावात शोधकार्य सुरू करण्यात आले. दिवसभर शोध घेऊनही मृतदेह सापडला नाही. आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास विनयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून एमआयडीसी पोलीस स्थानकात नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत असून, आत्महत्येमागचे कारण समजून घेण्यासाठी पोलिसांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची चौकशी सुरू केली आहे.







