अमेरिकेतील फ्रंटियर एअरलाइन्सच्या विमानामध्ये भारतीय प्रवाशाचा धुमाकूळ

फ्रंटियर एअरलाइन्स

फिलाल्डेफिया (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील फ्रंटियर एअरलाइन्सच्या विमानात प्रवासादरम्यान दोन प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणात भारतीय वंशाचा इशान शर्मा याच्यावर प्रवाशावर हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना फिलाडेल्फियाहून मियामीकडे जाणाऱ्या विमानामध्ये घडली असून विमान हवेत असतानाच हा गोंधळ झाला.

विमानामध्ये प्रवास करत असताना इशान शर्मा आणि कीनू इव्हान्स यांच्यात जोरदार वाद झाला. काही क्षणातच वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत आणि नंतर शारीरिक हाणामारीत झाले. व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांचा गळा धरताना दिसत आहेत. अन्य प्रवाशांनी दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला, पण प्रकरण अधिकच चिघळले. विमान मियामी विमानतळावर उतरल्यावर कीनू इव्हान्सने पोलिसांना तक्रार दाखल केली, ज्यात त्याने सांगितले की, इशानने कोणत्याही कारणाशिवाय त्याच्यावर हल्ला केला. इव्हान्सच्या म्हणण्यानुसार, इशान अचानकच विचित्र पद्धतीने वागू लागला आणि जीवे मारण्याची धमकी देत त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तक्रारीनंतर इशान शर्माला अटक केली आणि त्याला जॅक्सन वेस्ट हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. त्यानंतर त्याला टर्नर गिलफोर्ड नाईट करेक्शनल सेंटर या बंदोबस्त केंद्रात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इशानने इव्हान्सवर अचानक हल्ला केला आणि भांडणाच्या दरम्यान दोघेही जखमी झाले. या घटनेची अधिक चौकशी सुरू असून विमानातील सीसीटीव्ही फुटेज, प्रवाशांचे व्हिडिओ आणि साक्षीदारांचे जबाब घेतले जात आहेत.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सामाजिक माध्यमांवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. विमानात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांनी एअरलाइन प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. इशान शर्मावर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातून विमान कंपन्यांना प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here