स्व. भिलाभाऊ सोनवणे जयंतीनिमित्त शालेय साहित्य व भांडे किट वाटप

भिलाभाऊ सोनवणे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय भिलाभाऊ सोनवणे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप तसेच बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडे किटचे वितरण जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील आणि माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मोहाडी ग्रामपंचायत सरपंच धनंजय ऊर्फ डंपी सोनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे यांनी करताना स्व. भिलाभाऊ सोनवणे यांच्या जीवनकार्याचा आणि लोकसेवेतील योगदानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक गणेश बागुल यांनी केले, तर आभार सरपंच धनंजय ऊर्फ डंपी सोनवणे यांनी मानले.
कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले, “स्व. भिलाभाऊ सोनवणे हे केवळ पदांवर विराजमान नव्हते, तर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने गावागावांमध्ये विकासाचे ठसे उमटवले. त्यांची दूरदृष्टी, शिक्षणप्रेम आणि समाजासाठी असलेली बांधिलकी आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त करण्यात आलेली ही शैक्षणिक व सामाजिक मदत ही केवळ वाटप नसून, त्यांचा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या साहित्याचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन करत, बांधकाम कामगारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचेही आवर्जून सांगितले. या उपक्रमातून समाजाभिमुख कार्यसंस्कृतीची जपणूक करत, स्व. भिलाभाऊ सोनवणे यांच्या कार्यास अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामसेवक दिलीप पवार, सरपंच धनंजय ऊर्फ डंपी सोनवणे, मुख्याध्यापक भीमराव पवार, ग्रा.पं. सदस्य सजन राठोड, सुनील सोनवणे, विजय गवळी, अजय कोळी, भिका सोनवणे, मुकुंद पाटील, ज्ञानेश्वर ठाक, पुंडलिक सोनवणे, छगन राठोड, निंबा गवळी, माणिक गवळी, किरण गवळी, युवराज निरखे, सदाशिव महाले, आनंदा गवळी, रमेश कोळी यांच्यासह शिक्षक वृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here