जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) : पाचोरा बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अज्ञात व्यक्तींनी आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) या तरुणावर शुक्रवारी (दि.४) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार करत त्याची हत्या केली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, या तरुणावर तब्बल १२ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
याबाबत समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार शुक्रवारी ४ जुलैला संध्याकाळी दोन संशयित मारेकरी दुचाकीवरून आले. त्यांनी बसस्थानकाजवळ असलेल्या आकाश मोरेवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून दुचाकीवरून तात्काळ पसार झाले. यामुळे परिसरात धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ सील करून पंचनामा केला. गंभीर जखमी अवस्थेतील आकाश मोरेला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. आकाश मोरे हा अविवाहित असून, त्याच्या आईचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. तो सेंट्रिंग काम करीत होता. पोलिस भरतीसाठी त्याचे प्रयत्न सुरू होते, असे निकटवर्तीयांनी सांगितले.
पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीसात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.







