जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : शाळकरी व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनींच्या सुरक्षतेसाठी ठोस पाऊले उचलत जळगाव पोलीस दलाने कारवाईला सुरुवात केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात दामिनी पथक तयार करण्यात आले असून त्या पथकाकडून शाळा महाविद्यालयाच्या सुटण्याच्या वेळेस गस्त घातली जात आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी या पथकाने २१ रोडरोमिओंवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. कारवाईनंतर पोलिसांनी टवाळखोरांच्या मुलांसह त्यांच्या पालकांना समज देवून त्यांना सोडून दिले.
याबाबत वृत्त असे की, शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंकडून विद्यार्थीनीची छेड काढण्याच्या घटनांत वाढ झाली असल्याने, पोलीस अधीक्षकांनी या रोडरोमिओंवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांवरून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन पुरुष व एक महिला अंमलदार अशा १२ पुरुष तर ६ महिला अंमलदारांची या दामिनी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक शाळा महाविद्यालयाच्या परिसरात गस्त घालणार असून, रोडरोमिओंवर तात्काळ कारवाई करणार आहेत.
कारवाईच्या पहिल्याच दिवशी शहरातील मेहरुण तलाव परिसरात असलेल्या सेंट टेरेसा स्कुल, नूतन मराठा महाविद्यालय, एम. जे. कॉलेज, बेंडाळे कॉलेज, का. ऊ. कोल्हे विद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय याठिकाणी विनाकारण शाळेच्या बाहेर थांबून विद्यार्थीनींना बघून अश्लिल चाळे करणाऱ्या २१ टवाळखोरांवर पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर २५ जणांना समज देवून सोडून देण्यात आले.
सेंट जोसेफ हायस्कुल समोर स्वर्गीय मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये रोडरोमिओंवर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. याठिकाणाहून १४ जणांना ताब्यात घेण्यात आले तर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान पाटील, राहूल पाटील, अमित मराठे, प्रशांत सैंदाणे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणाऱ्या पाच रोडरोमिओंवर कारवाई केली.
कारवाई करण्यात आलेल्या रोडरोमिओंच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यानंतर या मुलांसह त्यांच्या पालकांना समज देवून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र यापुढेही ही मोहीम सुरु राहणार असल्याचे असल्याचेही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.







