कुरुंदवाडमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा

crime
file photo

कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) : कुरुंदवाड शहरात सुरू असलेल्या अवैध मावा विक्री व मटका जुगार यावर कुरुंदवाड पोलिस ठाण्याने बुधवारी (दि.९) सकाळच्या सुमारास चार ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन पानटप्यांवर छापे टाकण्यात आले. प्लेयर्स पान शॉप (सिद्धार्थ चौक) येथून नयुम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या ४० पुड्या, सुमारे एक किलो सुपारी आणि १४०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बाणदार पान शॉप (ईगल चौक) येथून सलीम गनी बाणदार यांच्याकडून माव्याच्या ४२ पुड्या आणि ८४० रुपये जप्त करण्यात आले. राधे पान शॉप (माळभाग) येथून दत्तात्रय पुंडलिक सूर्यवंशी यांच्याकडून ३८ माव्याच्या पुड्या, दीड किलो सुपारी आणि १६६० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.कोणतेही लेबल, सुरक्षेचा इशारा किंवा वैधानिक माहिती नसताना मावा उत्पादने खुलेआम विक्रीस ठेवण्यात आली होती. यासंबंधी पोलिस कॉन्स्टेबल खाडे, ऐवळे आणि जडे यांनी सरकारी फिर्यादी दिल्यानंतर संबंधित कायद्याच्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, नदीवेस नाका परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार प्रकरणातही कारवाई करण्यात आली. अनिल दशरथ गोपने याच्याकडून २२०० रुपये आणि महादेव ऊर्फ पिंटू देवगुंडा कुडचे याच्याकडून २८०० रुपये रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here