पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील ऊर्से (ता.मावळ,जि.पुणे)येथील एक बंगल्यात ३० जूनच्या पहाटे घरफोडी होऊन सदतीस तोळे सोन्याचे दागिने,एक,दीड किलो चांदी असा अंदाजे ३० लाखांचा ऐवज चोरीला गेला. त्याबाबत शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तो पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गु्न्हे शाखा युनीट पाचने उघडकीस आणला.घरफोडी करणारी टोळी पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेला बहूतांश मुद्देमाल जप्त केला.
पोलिस सहआयुक्त डॉ.शशिकांत महावरकर,अतिरिक्त आयुक्त सारंग आव्हाड,उपायुक्त डॉ.शिवाजी पवार (गुन्हे शाखा)यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली.ही घरफोडी झाल्यानंतर दोनच दिवसांत गु्न्हे शाखा युनीट पाचला वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून संतोष कसबे यांनी पदभार हाती घेतला होता.ते व त्यांच्या टीमपुढे ही घरफोडी हे एक मोठे आव्हान होते.त्यांनी एक्सप्रेस वे वरील अनेक सीसीटीव्ही तपासले.त्यात त्यांना या गुन्ह्यात वापरलेली मोटार (अल्टो एमएच१२सीडी२१६५ ही असल्याचे समजले.नंतर ते या गाडीच्या मागावर पाच दिवस राहिले.खबऱ्यांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून अखेर त्यांनी ही लाखोंची घरफोडी केलेल्या यशोदास विजय राठोड (वय २७,रा.ओझर्डे,ता.मावळ),रितेश करणसिंह राठोड (वय २७,रा.वेहेरेगाव,ता.मावळ), आकाश रवी मैनावत (वय २९),ऋतिक रवी मैनावत (वय २१,दोघे रा.भादस,ता.मुळशी) या चौकडीच्या मुसक्या देहूरोड येथील साईनगरच्या जंगलात आवळल्या.त्यांच्याकडून घरफोडीतील चोरीच्या ३६ तोळे ६ ग्राम पैकी ३५ तोळे ६ ग्राम म्हणजे २७ लाख १२ हजारांचे सोन्याचे दागिने आरोपींकडून पुन्हा हस्तगत केले.चार आरोपी पकडले. त्यांचा अभिषेक रणजित नानावत (रा.पौड) हा एक साथीदार फरार आहे.त्याचा आता पोलिस शोध घेत आहेत.या घरफोडीत चोरीला गेलेली एक दीड किलो चांदी फक्त आता मिळणे बाकी आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ.शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त गुन्हे डॉ.शिवाजी पवार, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्यासह सपोनि श्रीधर भोसले, पोहवा पवार, सूर्यवंशी, माने, पोना गोनटे, शेख, सोडगिर, पोशि खेडकर, गाडेकर, इघारे, गुट्टे, मुंडे, सोनवणे, ब्रह्मांदे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेतील सपोफौ माळी, पोहवा ननावरे, पोशि कारके, हुलगे यांनी केली आहे.







