भडगाव (तालुका प्रतिनिधी मनिष सोनावणे) : इंडसइंड बँक लिमिटेड भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी विक्की विठोबा पाटील (वय २४, रा. पथराड) हे ४ जुलै रोजी ग्रामीण भागातून कर्जाचे हप्ते वसूल करून मोटारसायकलने चाळीसगाव कार्यालयात परतत असताना त्यांच्यावर जबरी चोरी झाली होती. दोन अज्ञात इसमांनी गोंडगाव रोडवर त्यांना अडवून ६५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पलायन केले. या घटनेप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत बांबरुड परिसरातून माहिती मिळवली. आरोपींचा तपास करत असताना पथराड येथील गोपाल संजय पारधी (वय ३२) याला अटक केली. त्याच्या कबुलीनंतर गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींची माहिती समोर आली. यानुसार मयूर ज्ञानेश्वर साळुंखे, अतुल नाना पाटील, कैलास वाल्मिक पाटील (सर्व रा. पथराड, ता. भडगाव) यांनाही अटक करण्यात आली.
पोलीसांनी आरोपींकडून ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २ हजार रुपये किमतीचे अर्धवट जळालेले बायोमॅट्रिक मशीन, ५ हजारांचा सॅमसंग टॅब, १० हजारांची बजाज प्लेटिना (क्र. MH 54 A 8551), १० हजारांची स्प्लेंडर (क्र. MH 54 A 7375) व १० हजार रुपये रोख अशी एकूण जप्ती करण्यात आली.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. पांडुरंग पवार, सुशील सोनवणे, किशोर सोनवणे, निलेश ब्राह्मणकर, प्रवीण परदेशी, सुनील राजपूत, संदीप सोनवणे यांनी ही कारवाई पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.







