(उन्मेष गुजराथी (९३२२७५५०९८))
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। – दुष्यंत कुमार
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे तत्कालीन पीआरओ जयंत करंजवकर गेले. चालताबोलता माणूस रुग्णालयाच्या अनीतीचा अन हलगर्जीपणाचा बळी ठरला. कोरोनाच्या नावाखाली चाललेला हा गैरव्यवहार मी चव्हाट्यावर आणला. अनेक पत्रकार मित्रांनी आपापल्या वर्तमानपत्रात, न्यूज साईटवर या लेखाला प्रसिद्धी दिली. व्हाट्सअप फॉरवर्डची तर गिनतीच नाही.
या लेखनावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. व्यवस्थेबद्दल रोष व्यक्त केला. काहींनी प्रत्यक्ष फोन करुन संवाद साधला. यामध्ये काही स्वतः अशाच परिस्थितीतून गेलेले रुग्ण किंवा त्यांचे नातलग होते. काहींच्या आजूबाजूला थोडे तपशील बदलून असेच काही घडत होते. तर काही या अशा परिस्थितीच्या जाणिवेने अंतर्बाहय हादरुन गेलेले होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची संख्या यात मोठी होती.
प्रत्येकाला काही बोलायचे होते. मनातली अस्वस्थता व्यक्त करायची होती. माझ्या निकटवर्तीयांची ही वेदना हळूहळू सार्वत्रिक वाटायला लागली. ही गोष्ट एकट्या करंजवकरांची नाही, याची जाणीव होतीच. पण प्रत्यक्ष प्रचितीची व्याप्ती त्याहून भयानक सिद्ध झाली.
या लेखनामागचा उद्देश काय? असाही प्रश्न काहींना पडला होता. त्यांच्यासाठी हेच उत्तर. समाजमनातील या वाफेला कुठेतरी वाट मिळायला हवी होती. आधीच लॉकडाऊनमुळे लोक अडकून पडलेत. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नादात मनंही एकटी झालीत. त्यांना ‘तुम्ही एकटे नाहीत’, ही जाणीव करून द्यायची होती. या सगळ्या व्यापातही, एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यास तयार काही माणसे आहेतच. तीही यानिमित्ताने जोडली गेली. जयंत काकांच्या प्रकरणात रीतसर तक्रार करतानाही अनेकांची मदत झाली. पाठपुरावाही होत राहील. पण याहून अधिक ‘स्ववेदनेच्या मार्गाने जाताना इतरांच्या उपयोगी पडता आले’, याचे समाधानही राहील.
खरंतर असे समाधान शोधणारा मी एकटाच नाही. स्वतः या कोरोना प्रकरणात पोळून निघाले असताना, इतरांना हात देऊ पाहणारे असे अनेक आहेत. या एका पोस्टने अशा अनेकांशी संपर्क घडवून आणला. व्यवस्था कधी बदलेल माहित नाही, पण आपण काय बदलू शकतो यावर चर्चा झाली. स्वतःच्या मर्यादित सामर्थ्यात एकत्र लढण्याची तयारी सुरु झाली. त्यापैकीच एक जयेश मेस्त्री.
लेखक, गीतकार, व्याख्याते अशी त्यांची मूळची ओळख. पण कोरोनाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. एकीकडे सिनेनाट्य व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक गणिते बिघडलेली. त्यातच त्यांचा लहान मुलगा वगळता आई, वडील, पत्नी आणि ते स्वतः असे अख्खे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात वडिलांना इतर गंभीर आजार असल्याने त्यांची तब्येत खालावली.
या उपचारादरम्यान आलेले अनुभव त्यांनी सोशल मीडियावर मांडले. ज्यांनी अनुभवलंय त्यांना त्यांची वेदना कळली. काहींनी सहवेदना दाखवली. त्याचवेळी त्यांची पोस्ट ‘राजकीय’ समजून खालच्या पातळीवरची टीका करणारेही भेटले. कोरोना हा केवळ आजार नाही, सामाजिक विकृतीसुद्धा आहे याचे हे उघडे दर्शन. पण या दर्शनानेही जयेश खचले नाहीत. उलट स्वतः उपचार घेत असताना इतरांना मनोधैर्य जपण्याचा त्यांनी चंगच बांधला.
कोरोनाचा काळ भल्याभल्यांना हादरवून सोडतो. पण जयेश मेस्त्री यांनी हा काळ सकारात्मक चिंतनात घालवला. स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संस्कृती यावरचा त्यांचा अभ्यास यावेळी मदतीला धावून आला. कधी कोरोनामुळे अस्वस्थ झालेल्या जनांना उभारी द्यायची, तर कधी कोरोनामुळे नोकरी व्यवसाय हरवून बसलेल्यांना दिलासा. स्वतः उपचार घेत असतानाही ते सातत्याने लोकांसाठी लिहीत राहिले. दरम्यानच्या काळात पितृछत्र गमावल्यानंतरही त्यांच्या मनाचा समतोल ढळला नाही. आणि हे सगळे करताना कुठेही विचारवंताचा आव नाही. साध्या रोजच्या गोष्टींतून सहज संवाद.
‘काटा म्हणजे परिपूर्ण शिक्का नव्हे, किंवा छापा म्हणजे परिपूर्ण शिक्का नव्हे; दोन्ही मिळून एक शिक्का होतो.’ हे त्यांचे वाक्य सगळ्याच प्रसंगात ध्यानात ठेवण्यासारखं आहे. एकमेकांना साह्य करून आपल्याला या संकटाला तोंड द्यायचे आहे. ट्रोलिंग करणे सोपे आहे, पण टिकून राहणे कठीण. त्यासाठी मानवतेची लॉबी उभारायला हवी. आनंदाचे नेटवर्किंग करायला हवं, हाही विचार घेण्यासारखा. बुद्धिवंतांसाठी मीमांसा सोपी असेलही. पण सामान्य जनांसाठी ती त्यांच्या शब्दांत, तितक्याच प्रेमाने सांगायला हवी. नुसतेच तर्कट नको. कठोरशी कठोर वागणे ठीकच, पण इतरांच्या घावावर तेवढीच हळुवार फुंकर घालता यायला हवी. त्यांच्या श्रद्धा समजुतींतून त्यांना आधार द्यायला हवा. हा विचार ते त्यांच्या लेखनातून पुरेपूर जगलेत.
हे सर्व लेखन आता ‘कोरोना डायरीज’ नावाने ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे. (किंमत नाममात्र २० रुपये, संपर्क: जयेश मेस्त्री ९९६७७९६२५४) शिवाय कुणाला कोरोनाची भीती असेल तर त्यांच्याशी सुसंवाद साधायलाही ते तयार आहेत.
एक सकारात्मक साखळी आकार घेते आहे. अजूनही अनेक जोडले जातील. कदाचित परिवर्तनाची हीच सुरवात असेल…
https://www.fb.com/unmesh.gujarathi.1







