पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पेट्रोलपंपाची डीलरशिप मिळाल्याने त्याच्या जागेसाठी बिगर शेती परवाना व बांधकाम परवाना मंजुर करण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागून साडेतीन लाखांची लाच स्वीकारण्यास मान्य केलेल्या दौंड नगरपरिषदेच्या नगररचना सहायक विजयकुमार मधुकर हावशेट्टे (वय ३१) याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ३६ वर्षाच्या नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांनी बीपीसीएल कंपनीकडे पेट्रोलंपप डीलरशिपसाठी अर्ज केला आहे. पेट्रोल पंप उभारणी करता आवश्यक असलेली जागा त्यांनी लालचंद लुंड यांच्याकडून २० वर्षाच्या भाड्याने घेतली आहे. या जागेवर पेट्रोल पंप उभारणी करता दौंड नगरपरिषदेची बिगर शेती व बांधकाम परवाना आवश्यक असल्याने लुंड यांनी अर्ज केला आहे लुंड हे (वय ७३) वयोवृद्ध असल्याने तक्रारदार हे काम पहात आहेत. ३ जानेवारी २०२५ रोजी दौंड नगर परिषदेचे नगररचना सहायक विजयकुमार हावशेट्टे यांनी जागेवर जाऊन समक्ष पाहणी केली.
पेट्रोलपंपासाठी आवश्यक असणारा सर्वे अहवाल तसेच टेनटियु लेआऊट, फायनल लेआऊट आणि बांधकाम परवाना देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे २ लाख रुपयांची लाचेची मागणी करत असल्याचे तक्रार त्यांनी १० जानेवारी २०२५ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याअनुषंगाने १४ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ही सर्व मंजुरी करुन देण्यासाठी स्वत:साठी व दौंड नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी विजय कावळे यांच्यासाठी सुरुवातीला ४ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३ लाख ५० हजार रुपयांची लाच मागणी करुन ती लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.







