पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : प्रेयसीने लग्नाला नकार दिला. याकारणावरुन त्याने या प्रेयसीला उचलून दुसर्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. त्यात या तरुणीचे डाव्या मांडीचे हाड, बरगडी तसेच पाठीचा मणका फ्रॅक्चर झाला आहे.
याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यावरुन पोलिसांनी सुरेशसिंग शिवकुमार (वय ३०, रा. मनिंदरगडता, जि. कोरिया, छत्तीसगड) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. ही घटना नाणेकरवाडी गावातील वामन लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये २५ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मुळचे छत्तीसगडमधील राहणारे आहेत. फिर्यादी या खासगी नोकरी करतात. दोघांचे प्रेमसंबंध होते. सुरेशसिंग हा ८ ते १० महिने पुन्हा छत्तीसगडला गेला होता. तेथून तो परत आला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याच्याबरोबर लग्नास नकार दिला. या कारणावरुन २५ जुलै रोजी रात्री १० वाजता तो फिर्यादीच्या घरी आला होता. लग्नास नकार दिल्याने चिडलेल्या सुरेशसिंग याने ‘‘तू मेरे से शादी नही कर रही है, मै अभी तुझे जान से मार देता हूँ,’’ असे बोलून त्याने फिर्यादी यांच्या कानाखाली चापट मारली. त्यांना उचलून दुसर्या मजल्याच्या पॅसेजवरुन खाली फेकून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फिर्यादी तरुणीच्या डाव्या मांडीचे हाड, बरगडी तसेच पाठीचा मणका फ्रॅक्चर झाला असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदिप बोरकर अधिक तपास करीत आहेत.







