नाशिक (उपसंपादक संतोष रायचदे) : सातपूर परिसरात खाजगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून विद्यार्थ्यांचा वाद झाला. यात क्लासमध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याची बेंचवर बसण्याच्या वादातून हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सातपूर परिसरात राहणा-या यशराज गांगुर्डे चे त्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मित्रांसोबत बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. हा वाद तात्पुरता थांबला असला तरी, त्याचे परिवर्तन शनिवारी हिंसक प्रकारात झाले. दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी यशराजला क्लासच्या आवारात बोलावून घेतले आणि त्याच ठिकाणी लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली.
या हल्ल्यात यशराज गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, डोक्याला झालेल्या आघातामुळे त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर सातपूर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही ‘विधी संघर्षातील बालक’ या श्रेणीत मोडत असल्याने त्यांच्यावर बाल न्याय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.







