
जळगाव (संपादक सुनिल पाटील) : येथील मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रोजी भवरलाल जैन सभागृह,जळगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बॅंक, दाणा बाजार येथे उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाचे अध्यक्ष श्री.भालचंद्र पाटील हे उपस्थित होते. विचारमंचावर परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.श्री. रवींद्रसिंह पाटील, कार्यवाह प्रा. श्री .दिलीप भारंबे,कोषाध्यक्ष श्री शशिकांत नेहेते यांची उपस्थिती होती .
सभेच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ स्व. श्री.जयंत नारळीकर सर तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नागरिक व अहमदाबाद येथील विमान अपघातात प्राण गमावणारे प्रवासी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर परिषदेचे सचिव प्रा. दिलीप भारंबे यांनी मागील सभेचे इतिवृत्त मांडले व वर्षाचा आर्थिक ताळेबंद श्री .शशिकांत नेहेते यांनी सादर केला. संपूर्ण महाराष्ट्रात राज्यांतून सर्वात जास्त वैज्ञानिक उपक्रम राबविणारा विभाग असा नावलौकिक जळगाव विभागाने प्राप्त केल्याचे प्रा. भारंबे यांनी सांगितले. याअंतर्गत शनिवारी घेतला जाणारा विज्ञानवारी प्रकल्प, हसत- खेळत गणित, विज्ञानातील संकल्पना समजण्यासाठी शहर व परिसरातील शाळा, कॉलेज येथे प्रयोगांचे सादरीकरण, ईत्यादी उपक्रमांचे आयोजन वर्षभरात केले जाते.
अध्यक्ष मनोगत मांडताना श्री. भालचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आवड व गोडी निर्माण व्हावी, या हेतूने मराठी विज्ञान परिषद जळगाव विभाग वेगवेगळे उपक्रम राबविण्यात अग्रेसर असल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त करीत आगामी उपक्रमांसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ स्व. प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांनी साधारण दहाबारा वर्षापूर्वी मराठी विज्ञान परिषदेच्या उपक्रमात जळगाव येथे सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देत उत्कृष्ट मार्गदर्शन केले होते, याचे स्मरण श्री.भालचंद्र पाटील यांनी याप्रसंगी करून दिले.
सभेचे सूत्रसंचालन पक्षी अभ्यासक श्री. उमेश इंगळे सर यांनी केले तर आभार प्रा. रविन्द्रसिंह पाटील यांनी मानले. सभेला प्रा. आर. बी. देशमुख, प्रा. डॉ. आर. जी. बावने, श्री.मोहिनीराज नेतकर, श्री. सोमनाथ महाजन सर, श्री. किशोर महाजन,श्री .लक्ष्मण तायडे सर , सौ. जयश्री झांबरे, श्री.वसंत सोनवणे आदी संचालक व सभासद उपस्थित होते.






