पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : लोणावळा शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत २ किलो ७० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
६ ऑगस्ट रोजी रात्री ९.४६ वाजता, जयचंद चौक परिसरात मोटारसायकलवरून गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अब्दुल करीम शेख (वय ३८, रा. गुरव वस्ती, कुसगाव) याला गांजा विकताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २ किलो ७० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि मोटारसायकल असा १.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी तनवीर शेख याचा शोध सुरू आहे.
गेल्या आठवड्यात लोणावळा नगरपरिषदेच्या बैठकीत मावळ आमदार सुनील शेळके यांनी अंमली पदार्थ विक्रीबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई करत शहरात गुन्हेगारी रोखण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.







