पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : वाहनावर दंडात्मक कारवाई करत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला एका तरुणाने वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ७) सायंकाळी देहू फाटा येथे घडली.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कल्याण भोसले यांनी गुरुवारी (दि. ७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी इस्माईल सैफान भागानगरे (वय २३, रा. भोसरी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल कल्याण भोसले हे दिघी-आळंदी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते गुरुवारी सायंकाळी आळंदी येथील देहू फाटा येथे कर्तव्य बजावत होते. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना आरोपीने वाहनावर होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शासकीय कामात अडथळा आणला. आरोपीने भोसले यांना शिवीगाळ करत दगड फेकून मारहाण केली. यात भोसले यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि उजव्या हाताच्या मनगटाजवळ दुखापत झाली. तसेच, आरोपीने भोसले यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करत आहेत.







