मेरठ (उत्तरप्रदेश) (वृत्तसंस्था) : पायी चालत जाणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने तरुणावर गोळी झाडून पळ काढल्याचे पाहायला मिळते. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ७ ते ८ च्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मेरठच्या लिसाडी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माजीद नगर येथे हा प्रकार घडला आहे. हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अस्लम आहे. माजीद नगरमध्ये अस्लम त्याच्या कुटुंबासह राहतो.
यूपी के मेरठ में लिसाड़ी गेट के पास मामूली विवाद के बाद युवक की गोली मारकर हत्या-CCTV pic.twitter.com/6GZaIwpKGf
— आदित्य तिवारी / Aditya Tiwari (@aditytiwarilive) August 9, 2025
अस्लमचे काही लोकांशी वैर होते. सकाळी अस्लम रस्त्यावरुन जात असताना दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यापैकी एकाने अस्लमच्या डोक्यात मागून गोळी झाडली. गोळी लागताच अस्लम जमिनीवर पडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अस्लमवर दीड वर्षांपूर्वीही असाच हल्ला झाला होता, त्यावेळेसही त्याला गोळी लागली होती.
अस्लमचा मकबरा डिग्गी रेल्वे रोड येथील शहेनशाह नावाच्या तरुणाशी वाद होता, या वादातूनच अस्लमवर गोळीबार झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेच्या वेळी रस्त्यावर १० ते १५ लोक उपस्थित होते. यातील काहीजणांनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली.







