पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून १.०७ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रंजन कुमार निरंजन साहु (वय ४०, रा. कटक, ओडिशा) या सराईताला दोन महिन्यांच्या तांत्रिक तपासानंतर ओडिशातून पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी यापूर्वी विक्रोळी, मुंबई येथून गणेश महादेव लोखंडे यालाही अटक झाली होती. प्राथमिक चौकशीत आरोपी टोळीने देशभरातील ३० गुंतवणूकदारांची तब्बल ₹५.०१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.
फिर्यादी यांनी ‘Ventura Trading’ नावाच्या शेअर ट्रेडिंग जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना आयपीओ आणि स्टॉक ट्रेडिंगमधून १० ते ५० टक्के परताव्याचे आश्वासन देणाऱ्या व्हॉट्सअॅप गटात सामील करण्यात आले. नफ्याचे बनावट स्क्रीनशॉट पाहून त्यांनी अॅप डाऊनलोड करून १.०७ कोटींची गुंतवणूक केली. अॅपवर ३.४० कोटी नफा दाखवला गेला, मात्र रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच विविध शुल्कांच्या कारणावरून टाळाटाळ केली गेली.
तपासादरम्यान आरोपींच्या खात्यातील ६९.७५ लाखांचा मागोवा घेत पोलिसांनी गणेश लोखंडे याला अटक केली. त्याच्या कबुलीजबाबावरून मुख्य आरोपी साहुचा शोध घेऊन कटक, ओडिशा येथून त्याला पकडण्यात आले.सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मिडियावरील गुंतवणुकीच्या जाहिरातींपासून सावध राहण्याचा आणि अनधिकृत अॅप्स वापरणे टाळण्याचे आवाहन केले आहे.







