यवतमाळ (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. यात वर्गातील मुलीनेच मुलांना मदत केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलगा अन् मदत करणाऱ्या मुलीला अटक करण्यात आली असून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पीडित मुलगी इयत्ता तिसरीत शिकते; आरोपी मुलगा आणि मदत करणारी मुलगी हे दोघेही त्याच वर्गातील आहेत.
यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीतील मुलीवर तिच्याच वर्गातील मुलाने बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केला. हे कृत्य करण्यात एका मुलीनेही त्याला मदत केली. ही घटना १ ऑगस्ट रोजी दुपारी बाभूळगाव तालुक्यातील एका गावात घडली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात विधीसंघर्षग्रस्त मुलगा आणि मुलगी या दोघांविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
एकाच गावातील आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या इयत्ता तिसरीतील नऊ वर्षांच्या मुलाने व मुलीने केलेले कृत्य ऐकून सर्वांनाच हादरा बसला. पीडित मुलीला लघवीच्या जागेवर जखम झाल्याने तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने बाभूळगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या संवेदनशील प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून पॉक्सोन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यातील मुलाला यवतमाळ येथील बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे, तर मुलीला अमरावती येथील बाल निरीक्षणगृहात ठेवले आहे. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती बाभूळगाव ठाणेदार लहुजी तावरे यांनी दिली.







