बांधकाम व्यावसायिकाला मागितली पाच कोटींची खंडणी; तोतया टोळीचा भांडाफोड

crime
File Photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला कुख्यात गुंड अरूण गवळीचा पी. ए. बोलत असल्याची बतावणी करून ५ कोटी रूपयांची खंडणी मागणार्‍या एका तोतया टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या पथकाने आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेले तिघेही बीडचे रहिवासी आहेत.

सध्या बांधकाम व्यावसायिकाचा त्यांच्या भागीदारासोबत न्यायालयात वाद सुरू आहे. याच वादाचा फायदा घेत एका अज्ञात नंबरवरून या व्यावसायिकाला थेट अरूण गवळी यांचा पीए बोलत असल्याची बतावणी करून ५ कोटी रूपयांची खंडणी मागण्यात आली. एवढेच नाही तर पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती. खंडणीची रक्कम देण्यासाठी या तोतया टोळीने फिर्यादींना विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. त्यानुसार, लष्कर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या तिघांना हॉटेलमध्येच रंगेहाथ ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीमध्ये हे तिघेही कोणत्याही मोठया गुन्हेगारी टोळीशी संबंधित नसल्याचे समोर आले आहे. या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here