पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : जड सॅक पाठीला लावून फिरणार्या तरुणाची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पाठीवर जड ओझे असल्याने पळताना ठेच लागून तो पडला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील सॅकमध्ये २ लाखांचे ५ लॅपटॉप मिळून आले. चौकशी करता त्याने वाघोलीमधील एका उघड्या दरवाजातून आत शिरुन पहाटे लॅपटॉप चोरले होते. गुन्हा दाखल होण्याअगोदरच चोरटा मुद्देमालासह पोलिसांच्या हाती सापडला होता.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार शिरगिरे व कुदळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पुणे -सोलापूर रोडवरील चिंतामणी पार्क प्लॉटिंगजवळ एक जण संशयितरित्या पाठीला जड वजनाची बॅग अडकवून फिरत आहे. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक त्या परिसरात शोध घेत होते. त्यावेळी कुंजीरवाडी येथे पोलिसांना तो दिसला. त्याची आणि पोलिसांनी नजरानजर झाली. तेव्हा तो पळून जाऊ लागला. पोलीस त्याचा पाठलाग करत होते.
पाठीवर जड ओझे घेऊन धावताना त्याला ठेच लागली व तो खाली पडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये ५ लॅपटॉप मिळून आले. त्याबाबत त्याला माहिती देता येईना. अधिक चौकशीत त्याने १२ ऑगस्टला पहाटे वाघोली येथून हे लॅपटॉप चोरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी लॅपटॉप बाबत वाघोली पोलिसांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे लॅपटॉप चोरीचा गुन्हा दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले़.सागर नागराज याने वाघोली येथील गाडेवस्तीमधील ऑक्सी व्हॅली फेज २ येथील भगवंत कॉम्प्लेक्स डी मधील रुममधून १२ ऑगस्टला पहाटे २ वाजता १ लाख ९५ हजार २२१ रुपयांचे ४ लॅपटॉप चोरुन नेले होते.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मीता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, शिरगिरे, कुदळे, वीर, पाटील, कुंभार, गाडे, कर्डिले, सोनवणे, दडस, थोरात यांनी केली आहे.







