नांदेड (प्रतिनिधी) : स्पा सेंटरच्या नावाखाली वैश्या व्यवसाय सुरु असणाऱ्या ठिकाणावर नांदेडच्या वजीराबाद पोलीसांनी छापा मारून अवैध धंद्याचा भंडाफोड केला आहे. वजीराबाद परिसरातील तरोडेकर मार्केट इमारतीतील द फ्युजन स्पा सेंटर येथे पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. पोलिसांनी ५ हजार रुपये देऊन बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या रॅकेटचा भंडाफोड केला. यावेळी ४ महिला आणि ३ पुरुष असे सात जणांना ताब्यात घेण्यात आले. यातील एक युवती आसाम तर इतर दोघी दिल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
नांदेडमध्ये अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय जोरात सुरु आहे. आठवडाभरापूर्वी भाग्यनगर पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या स्पा सेंटरवर कारवाई केली होती. ही घटना चर्चेत असताना बुधवारी रात्री वजीराबाद भागातील तरोडकर मार्केट इमारतीतील द फ्युजन स्पा सेंटरवर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी दोन युवती आणि दोन ग्राहक वेगवेगळ्या रूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पोलिसांना आढळले.
पोलिसांनी स्पा सेंटरचा मॅनेजर रब दीपकसिंघ रशपालसिंघ धिल्लो, रिसेप्शनिस्ट गौरव सरपाते, विनीत कोसले, महिला रिसेप्शनिस्ट सारिका केदार यांच्यासह इतर ३ युवतींना ताब्यात घेतले. यातील एक युवती आसाम आणि इतर दोन दिल्ली राज्यातील रहिवासी आहे. कुंटनखाना चालण्यासाठी स्पा सेंटर चालकाने इमारतीतील 4 ते 5 गाळे भाड्याने घेतले होते. बाहेर राज्यातील मुली आणून मागील अनेक महिन्यांपासून या स्पा मध्ये हा धंदा सुरु होता.
वजीराबाद परिसर हा मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. नागरिकांची या बाजारपेठेत नेहमी वर्दळ असते. अशा ठिकाणी हा व्यवसाय सुरु होता. महिन्याभरा पूर्वी देखील पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे या द फ्युजन स्पा सेंटरमध्ये छापा टाकला होता. मात्र तेव्हा काही आढळून आले नाही. शेवटी ५ हजार रुपये देऊन बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला. वजीराबाद पोलिसांनी स्पा चालक पवितसिंघ आरतीया, पुरभाजी हरकरे यांच्यासह ६ जणांविरोधात पीटा कायद्या अंतर्गत कलम ३, ४, ५ कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे करीत आहेत.







