कोल्हापूर (प्रतिनिधी सतिश चव्हाण) : घरातच १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजीतील तीन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख २४ हजाराच्या बनावट नोटा आणि ७० हजार ७०० रुपयांचे इतर साहित्य असा २ लाख ९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बाजारात बनावट नोटा खपविण्याचे प्रमाण वाढल्याने नोटा छपाईतील सक्रिय टोळ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षकांनी दिले होते. त्यानुसार तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार संतोष बरगे व प्रदीप पाटील यांना इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरिक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला. त्यावेळी अनिकेत शिंदे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेता त्याच्या खिशात काही बनावट नोटा मिळून आल्या. अधिक चौकशी करता त्याने घरातच बनावट नोटांची छपाई करत असल्याचे सांगितले. त्यामध्ये अजून दोघे मदत करत असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी अनिकेत विजय शिंदे (वय २४ रा. पंत मंदिर समोर मंगळवार पेठ), राज रमेश सनदी (वय १९ रा. भुईनगर शहापूर) आणि सोएब अमजद कलावंत (वय १९ रा. परीट गल्ली गावभाग) या तिघांना ताब्यात घेतले आहे.
मंगळवार पेठ परिसरातील पंत मंदिरासमोरील शिंदे राहण्यास असलेल्या घरात छापा टाकला. त्यावेळी कलावंत व सनदी मिळून आले. घरातच बनावट नोटा व नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य मिळून आले. पथकाने या तिघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईत ५०० रुपयांचा ३९२ आणि १०० रुपयांच्या २८२ अशा २ लाख २४ हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. प्रिंटर, नोटांसाठीचा कागद, दोन मोबाईल व इतर साहित्य असा ७० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या तिघांवर गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरिक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.







