पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : सिंहगड रोड भागातील गणेशमळा परिसरात तसेच कोंढवा बिबवेवाडी रोडवरील सोसायटीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ११ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर पर्वती आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात २९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या गणेशमळा भागातील ओैंदुबर सोसायटीत राहतात. त्या कुटूंबियासह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, ८ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. नुकताच हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक किरण पवार करतात.
तसेच, बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील मोरयानगरी सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेचा फ्लॅट फोडत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तर, बेडरूममध्ये घुसत कपाटातील सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय सोमवारी (११ ऑगस्ट) सकाळी सदनिका बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस हवालदार मेमाणे तपास करत आहेत.







