अहिल्यानगर (जिल्हा क्राईम रिपोर्टरअण्णासाहेब बनसोडे) : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात नव्या श्वानाची भरती झाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या श्वानाचे नामकरण केले असून या नव्या श्वानाला पोलीस दलात यापुढे ” ब्रावो ” या नावाने ओळखले जाणार आहे. ब्रावो हा सद्या ४५ दिवसांचा नर पिल्लू असून गुन्हे शोध या कामाकरिता पुण्यातून आणले आहे. पुढील ४ महिने त्याचे संगोपन करून पुढे ९ महिन्यांसाठी प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.
दर १० वर्षांनी नव्या श्वानाची भरती
प्रशिक्षणानंतर ब्रावो जिल्हा पोलीस दलात गुन्हे शोध कामासाठी रुजू होणार असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. अहिल्यानगरच्या पोलीस दलामध्ये गुन्ह्याचा शोध, स्फोटके शोध तसेच अंमली पदार्थांच्या शोधासाठी अनेक वर्षांपासून प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली जाते. अनेक मोठ्या गुन्ह्याचा शोध श्वानामुळे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, पोलीस दलात श्वानाचे निवृत्तीचे वय १० वर्षे असल्याने दर १० वर्षांनी पोलीस दलात नव्या श्वानाची भरती होत. असते.







