नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : सिन्नर तालुक्यात शेतात जाणार्या शेतकर्यावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केल्याची घटना काल सकाळच्या सुमारास तालुक्यातील कारवाडी येथे घडली.विकास रेवबा जाधव हे त्यांच्या शेत गट नं. ८३ मधील शेतात सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असताना शेतात दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जाधव यांची गाळण उडाली.
बिबट्याने त्यांच्या अंगावर झेप घेतल्याने त्यांच्या हाताला व पायाला बिबट्याची नखे खोलवर रुतली गेली. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. त्यांनी बिबट्याला प्रतिकार केल्याने बिबट्याने त्यांना सोडून पळ काढला. जाधव यांनी गावात येत ग्रामस्थांना याबाबत खबर दिली. वनविभागाला माहिती मिळताच सेवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
जाधव यांना देवपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकर्यांमध्ये भिती पसरली आहे. त्यातच जाधव यांच्यावर हल्ला झाल्याने शेतकरी घराबाहेर पडण्यासही धजावत नाहीत. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.







