हॉटेल तारावर पोलिसांची धाड; तीन महिलांची सुटका

sex racket
File Photo

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : शहराच्या एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. बुधवारी (दि.२०) सायंकाळी ‘हॉटेल तारा’ येथे टाकण्यात आलेल्या या छाप्यात, पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी हॉटेलचा मालक आणि दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार, मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने कारवाई करत एक बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. त्याने खोलीत पोहोचल्यानंतर ठरलेल्या संकेतानुसार दोन वेळा लाईट बंद-चालू केला. हा संकेत मिळताच पोलिसांनी तात्काळ हॉटेलवर छापा टाकला आणि तिथून तीन पीडित महिलांची सुटका केली.
हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या अनैतिक आणि बेकायदेशीर घटनांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पीडित महिलांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमध्ये हॉटेल मालक आणि दोन ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि गृह उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, विठ्ठल फुसे, रवींद्र गायकवाड, निलिमा सुशीर, हवालदार दीपक पाटील, भूषण कोल्हे, मनीषा पाटील आणि वाहिदा तडवी यांचा समावेश होता. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here