गाझियाबाद (वृत्तसंस्था) । जिल्ह्यातील मुरादनगर येथील एका महिलेनं आपल्या पतीवर नोरा फतेहीसारखा फिगर मिळवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार, तिचा पती फिजिकल एज्युकेशन टीचर आहे. तिला रोज तीन तास जिममध्ये व्यायाम करण्यास भाग पाडायचा आणि तिला जेवायलाही देत नव्हता, डायट करुन तिचं शरीर त्याला नोरा फतेहीसारखे करावयाचे होते. पीडित महिलेने सांगितले की, तिचा पती वारंवार तिच्या दिसण्याबद्दल अपमानास्पद बोलायचा.
मार्च २०२५ मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या पतीनं तिच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि आई-वडिलांच्या खोलीत झोपायला गेला. त्यानंतर त्याचं वागणं आणखी बिघडत गेलं. त्याला दिसायला सुंदर असणारी बायको पाहिजे होती. त्यामुळे तो तिला दररोज ३ तास जिम करायला लावत होता. दरम्यान तिला जेवायला देत नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, सासू-सासरे तिला आणि तिच्या पतीला एकत्र बाहेर फिरायला कधीच परवानगी देत नसत.सासू घरकामावरून सतत ओरडायची, सासरे पुन्हा पुन्हा अधिक पैशांची मागणी करायचे. पीडितेच्या कुटुंबियांनी लग्नासाठी सुमारे ७५ लाख खर्च केला होता. यामध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ कार, २४ लाखांची रोख रक्कम व दागदागिने यांचा समावेश होता. एवढा खर्च करूनही, पीडितेला रोज मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता. अखेर वैतागून या विवाहितेने पोलिसात तक्रार दाखल केली.







