पारोळा (क्राईम रिपोर्टर अरविंद जाधव) । पारोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बहादरपुर शिरसोदे गावाजवळ अवैधरीत्या सुरू असलेला बनावट देशी दारूच्या कारखाना पोलिसांनी आज दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी मोठी कारवाई करत दारू कारखाना उद्ध्वस्त केला. त्यात सुमारे ४० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, पारोळा पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पारोळा पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली, असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या माहितीवरून पारोळा पोलिस गुप्त माहिती गोळा करत असताना असे निष्पन्न झाले की, पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बहादरपूर, शिरसोदे गावाजवळील बोरी नदीच्या काठावर एका पत्र्याच्या शेडमध्ये टँगो पंच नावाच्या बनावट देशी दारूचा अवैध कारखाना सुरु आहे. याची पो.नि सचिन सानप यांनी संपूर्ण खात्री करून पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, चाळीसगांव चे अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय पोलिस अधिक्षक विनायक कोते यांच्या नेतृत्वात सापळा रचून धडक कारवाई केली.
यावेळी पोलिस पथकाबरोबर २ शासकीय अधिकारी पंच म्हणून घेत अवैधरित्या सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी बनण्याच्या प्रक्रियेत असलेली मोठ्या प्रमाणात देशी दारू, कच्चा माल, दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, यंत्रसामग्री, दारू वाहतूकीसाठीचे वाहने आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
दरम्यान कारखान्यात तयार असलेली विक्रीसाठीची सुमारे १ लाख २४ हजार रुपये किंमतीच्या ३१०० सीलबंद बाटल्या, सुमारे २८,०००/- हजार रुपये किंमतीच्या विक्रीपूर्व अवस्थेतील ७०० बाटल्या, सुमारे ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ८०० लीटर स्पिरीट, सुमारे ३ लाख रुपये किंमतीची १५०० लीटर तयार दारू, ५ लाख रुपये किंमतीच्या आर ओ व सी एन सी मशीन, ६ लाख १२ हजार रुपये किंमतीच्या ६१,२०० रिकाम्या बाटल्या, ३० हजार टँगो पंच बाॅटल बुच, पाणी लिफ्टिंग मशीन, इलेक्ट्रिक स्टॅबिलायझर, लहान मोठ्या आकाराच्या पाण्याच्या टाक्या, मिक्सर मशीन, इलेक्ट्रिक स्टार्टर्स, ५ लाख रुपये किंमतीची बोलेरो पिकअप मालवाहू वाहन, ५ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार तसेच ५ लाख रुपये किंमतीची पत्र्याचे ४० बाय ४० फुटांचे शेड असा एकूण ४० लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाई ही पारोळा पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक अमोल दुकळे, पोलीस हवालदार महेश पाटील, पो. ह. सुनील हटकर, शरद पाटील, प्रविण पाटील, अनिल राठोड, अजय बाविस्कर, आकाश माळी, विजय पाटील, शेखर साळुंखे यांच्या सह चालक पो.ह. संजय पाटील व वेलचंद पवार यांच्या पथकाने केली. पारोळा पोलीस ठाण्याची ही अवैध दारू निर्मिती व वितरणाच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई असून, यामुळे स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांवर याचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे. या कारवाईमुळे जनमानसात पारोळा पोलिसांचे आभार मानले जात आहे.







