पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । सातारा येथे गुरुवारी (२८ ऑगस्ट) भर दुपारी चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी चोरणारा चोर लखन भोसले याचा पुण्यातील शिक्रापूर भागात पोलिसांनी एन्काऊंटर केला. सातारा पोलीस लखन भोसलेच्या मागावर पुण्यात आले असताना ही घटना घडली आहे.
लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी आहे. गुरुवारी (२८ ऑगस्ट) दुपारी ३ च्या सुमारास कोयत्याचा धाक दाखवून लखन याने एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली होती. त्यानंतर इतर दोन आरोपींसह लखन पसार झाला होता. लखनच्या शोधासाठी सातारा पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले होते. लखन हा पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर भागात असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक शिक्रापूर भागात दाखल झाले. लखनसह दोन आरोपी पोलिसांच्या रडावर होते.
लखनची माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने चाकूने हल्ला केला. लखनने हल्ला करताच पोलिसांनी बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडली. ती गोळी लखनच्या कमरेला लागली. यात लखन गंभीर झाला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत लखन भोसले हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर दरोडे, जबरी चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.







