जळगाव (संपादक सुनिल पाटील) । शहरातील सांस्कृतिक वारसा म्हणून बालगंधर्व खुले नाट्यगृह ओळखले जाते. सद्यस्थितीत उपलब्ध झालेल्या बंदिस्त नाट्यगृहामुळे प्रशासनासह रंगकर्मींचेही या नाट्यगृहाकडे दुर्लक्ष झाले आहे. आता या दुरावस्थेत आणखी भर पडली असून, रविवारी, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता काही तरुणांनी नाट्यगृहात मद्यासह मांसाहाराची पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या प्रकाराची माहिती मिळताच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ छापा टाकला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित चार जण घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकाराची तक्रार मिळताच महानगरपालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले आणि बांधकाम अभियंता आर.टी. पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी पोलिसांनाही माहिती मिळाल्याने डायल ११२च्या पथकासह जिल्हापेठ पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाहणी करत असताना पार्टी करणाऱ्यांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर चार जण पसार झाले आहेत.
बालगंधर्व नाट्यगृहाच्या मागील बाजूला मोकाट गुरांच्या कोंडवाड्याचा दरवाजा उघडा असल्यामुळे आरोपी आत शिरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि मांस शिजविण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी करत असून फरार चार जणांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.







