पारोळा (क्राईम रिपोर्टर, अरविंद जाधव) | जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या म्हसवे शिवारात पारोळा पोलिसांनी मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची होणारी मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील एका राजस्थानी हाॅटेलवर छापा टाकून तब्बल १६४ किलो ६८४ ग्रॅम वजनाचे अफूचे सुकलेले बोंडे जप्त केले आहे. या कारवाईत अंमली पदार्थ अफु सह एक ट्रक, एक हॅरियर कार, रोख रक्कम असा एकूण ५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, सोमवारी दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ‘श्री रामदेव राजस्थानी ढाबा’ येथे काही लोक अंमली पदार्थांची देवाणघेवाण करत असल्याची गोपनीय माहिती पारोळा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने धाडसी छापा टाकला. या छाप्यात एका आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले, तर त्याचे तीन ते चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पसार झालेल्या आरोपींनी आपली २ वाहने ढाब्यावरच सोडून पळ काढला त्यात एक हॅरियर कार पोलिसांनी नंतर जप्त केली आहे.
पोलिसांनी केलेल्या सदर कारवाईत आरोपी शैतानाराम मानाराम विश्नोई (वय ३४, रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली. त्याच्या जवळून मिळालेला मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला, त्यात १३ लाख १७ हजार रूपये किंमतीचा १६४ किलो ६८४ ग्रॅम वजाचा अफूचे बोंडे ( कळी ), २० लाख रूपये किंमतीची टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक – आर जे -१९-सी जी -२१११), १० हजाराचा वजन काटा, २ लाख ५५ हजार ४७० रूपये रोख, १५ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची कार असा एकुण ५० लाख ८२हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शैतानाराम विश्नोई आणि त्याच्या फरार साथीदारांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन पुढील तपास करीत आहेत.







