येत्या १५ तारखेला शिवनिश्चलच्या मदतनिधी उपक्रमाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन

शिवनिश्चल

नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | देवळा येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने अनाथ व निराधार मुलांसाठी येत्या १५ सप्टेंबरला मदतनिधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे,: आई-वडील नसणाऱ्या अनाथ, निराधार व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून, इतरही शैक्षणिक मदत करण्यासाठी पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने या वर्षाचा मुख्य मदतनिधी वितरण सोहळा १५ सप्टेंबर २०२५ रोजी देवळा येथे होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट अनाथ व निराधार मुलांना दत्तक घेत त्यांचे पालकत्व निभावत आहे. या अनाथ मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी यात अंतर्भूत असून आर्थिक व शालेय साहित्याची मदत केली जाते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हे सामाजिक काम चालू असून व्याख्यानाच्या माध्यमातून येणारे मानधन व दानशूरांची मदत यातून हे काम सुरू आहे. या उपक्रमाचे हे बारावे वर्ष असून अविरतपणे हे काम ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे, ज्या स्थितीत ज्यास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा यशवंत गोसावी यांनी केले आहे

प्रा.गोसावी यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या मदतीचे हे १२ वे वर्ष असून अशा १२७ मुलांचे पालकत्व या ट्रस्टने स्वीकारलेले आहे. या कार्यक्रमप्रसंगी प्रसिद्ध वृत्तनिवेदक व पत्रकार विलास बढे यांना यावर्षीच्या शिवनिश्चल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच अनाथ व निराधार मुलांसाठी होत असलेल्या ‘शिवाधार’ याअश्रमाच्या च्या बांधकामाचे भूमिपूजनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या दिवशी करण्यात येणार आहे. यावेळी जयंत पाटील, खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे हेही उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील अनाथ व गरजू मुलांना शालेय व इतर साहित्य देत दत्तक घेण्याचा हा मुख्य कार्यक्रम १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या प्रागंणात होणार आहे. त्यावेळी राज्यातील अनेक दिग्गज मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाआधी प्रसिद्ध शाहीर सुरेश जाधव यांच्या पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. राज्यातील अनाथ मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच मायेचे पांघरून घालण्याच्या उद्देशाने संस्थेने हे कार्य हाती घेतले असल्याचे श्री.गोसावी यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे कार्याध्यक्ष डॉ.डी.के.आहेर, डॉ.सुनील आहेर, भगवान आहेर, अनिल भामरे, पंकज जाधव व इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here