नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) । अनैतिक प्रेमसंबंधात संशयित तरुणाने ३० वर्षीय विवाहितेस भेटण्यासाठी वारंवार मेसेजद्वारे आग्रह धरल्याने घाबरलेल्या विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाईलवरील संभाषणासह मेसेज रेकॉर्डमुळे या प्रकाराचा अखेर उलगडा झाला. संशयित उमेश भवर याच्याविरोधात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, चांडक सर्कल परिसरातील एका टॉवरमध्ये सीए असलेला व्यक्ती कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्याच्या फिर्यादीनुसार, नियमित कामकाज करत असताना २५ ऑगस्टला दुपारी ४ वाजता त्यांच्या पत्नीने घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे आढळले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर पतीने पत्नीचा मोबाईल पडताळला तेव्हा त्याला खरा प्रकार लक्षात आला.
मोबाईलमधील चॅटिंगसह काही आक्षेपार्ह व गंभीर स्वरुपाचे मेसेजेस पाहताच उमेश भवर नावाच्या संशयिताने मेसेजेस केल्याचे पतीस आढळले. या मेसेजसह त्याच्या वर्तनामुळे पत्नी मानसिक तणावात व घाबरलेली होती, याची जाणीव पतीला झाली. त्याने मंगळवारी (दि.९) मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दत्ता गोडे करत आहेत.







