जळगाव (संपादक सुनिल पाटील) : ज्येष्ठ दिग्दर्शक खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चिंतामण पाटील यांच्या पासष्टी वर्षपूर्तीनिमित्त गुरुसन्मान सोहळा दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रारंभी खानाप्रच्या सर्व दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते रंगदेवता नटराज पूजन व दीपप्रज्वलन केले.प्रमुख अतिथी व सत्कारमुर्ती व्यासपीठावर बसल्यानंतर मकरंद देशमुख यांनी रचलेले व स्वरबद्ध केलेले मंगलाचरण आणि यानंतर कै.डॉ.उल्हास कडूसकर लिखीत व कै.शरदचंद्र धर्माधिकारी स्वरबद्ध केलेली संगीत शब्द सुरांच्या रेशीमगाठी या नाटकाची नांदी संजय कुलकर्णी, दिलीप देसले, भुषण खैरनार,कु. स्वाती डहाळे,कु. मयुरी हरीमकर यांनी सादर केली.त्यांना संवादिनीवर राजेंद्र माने, तबल्यावर तुषार पुराणिक,पखवाज दर्शन गुजराथी यांनी साथसंगत केली.
आजवरचे नाट्यक्षेत्रासाठी असलेले योगदान खऱ्या अर्थाने हौशी रंगभूमीसाठी पथदर्शी असून त्यांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे आहे असे गौरवोद्गार पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे संचालक मुळचे असोद्याचे असलेले प्रा डॉ. प्रवीण भोळे यांनी काढले ते दि. १६ सप्टेंबर २५ रोजी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे खान्देश नाट्य प्रतिष्ठानच्या व चिंतामण पाटील मित्र परिवाराने आयोजित केलेल्या गुरुसन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे नाट्य संस्कार अकादमीचे नाट्यगुरु प्रकाश पारखी यांनीही अध्यक्षीय भाषणातून चिंतामण पाटील यांच्या नाट्य विषयक कार्याचे कौतुक करुन अविरतपणे हौशी रंगकर्मीना घडविण्याचे कार्य चिंतामण पाटील यांनी यापुढेही सुरु ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या सोहळ्याच्या व्यासपीठावर खा. ना.प्र. ची रंगकर्मी आणि मराठी बिग बॉस विजेती अभिनेत्री मेघा धाडे- पावसकर. रंगकर्मी, मालिका, चित्रपट कलाकार समीर देशपांडे, निमंत्रक शरद भालेराव यांचेसह नाट्यगुरु चिंतामण पाटील, त्यांच्या पत्नी सौ. मिनाक्षी पाटील, पुणे येथील लेखिका सुलभा कुळकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात शरद भालेराव यांनी गुरु सन्मान कृतज्ञता सोहळ्याच्या आयोजनामागचे प्रयोजन विशद केले. मनोगतात सुलभा कुळकर्णी यांनी खा.ना. प्र. आणि चिंतामण पाटील यांच्या मुळे रंगभूमीची सेवा करता आली अशा भावना व्यक्त केल्या. वर्गमित्र प्रा. राजेंद्र देशमुख यांनी नुतन नाट्य मंडळ ते खानाप्र मधील आठवणींना उजाळा देत चिंतामण पाटील नाट्य पंढरीचे सच्चे वारकरी असल्याचे सांगितले. सेलीब्रेटी कलावंत मेधा धाडे-पावसकर यांनी आम्ही बालनाट्य प्रशिक्षणातून आम्ही घडलो आहे तेच प्रशिक्षण यापुढेही सरांनी सुरू ठेवावे असे आग्रहपूर्वक सांगितले तर समीर देशपांडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही सरांनी मोठा शिष्यवर्ग घडवला असे कृतज्ञतापूर्वक सांगितले.
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे वतीने त्यांचे स्वीय सहाय्यक नवलराजे पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.पाहुण्यांचा परिचय रंगकर्मी मंदाकिनी महाजन यांनी करून दिला तर सन्मान पत्राचे वाचन बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह व जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चिंतामण पाटील यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, ड्रेस, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह व रोख रुपये एकवीस हजार देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांनी सांगितले की, माझे शिष्यच माझ्यासाठी सेलिब्रिटी असून हौशी रंगभूमीसाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे सेवानिवृत्त उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार जेष्ठ रंगकर्मी पीयुष रावळ यांनी मानले.
यावेळी जिल्ह्यातील व शहरातील कलावंत, मुंबई, पुणे, नाशिक,धुळे,नंदूरबार,यवतमाळ येथील कलावंत, जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांचे कुटुंबीय व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







