थाळनेर पोलिसांची गांजा शेतीवर कारवाई; ३४ लाख २ हजार रुपयांचा गांजा जप्त

थाळनेर पोलिसांची

थाळनेर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) । थाळनेर पोलिस ठाणेहद्दीतील बभळाज गाव शिवारात थाळनेर पोलिसांनी कारवाई करत ९७२ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहे. जप्त केलेल्या गांज्याची किंमत ३४ लाख २ हजार रुपये असून, याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन २ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, थाळनेर पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि शत्रूघ्न पाटील यांना शनिवारी (दि.२०) बभळाज गाव शिवारात सोज्यापाडाचे मागे डोंगरालगत गांजा वनस्पतीची लागवड केली असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे आवश्यक साधन सामुग्रीसह राजपत्रित अधिकारी रविंद्र कुमावत, नायब तहसिलदार शिरपूर, शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर, पोलीस अधिकारी, अंमलदार व फॉरेन्सिक पथकासह या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी गांजाची लागवड केल्याची आढळून आले. पोलीस आल्याचे पाहून रखवाली करणारे दोघे पळून जाऊ लागले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे गेंदाराम झिपा पावरा व रुपसिंग भावसिंग पावरा सांगितली. शेताबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की ही वनजमीन असून, त्यांचे साथीदार अमरसिंग थावऱ्या पावरा, डुबाड्या ग्यानसिंग पावरा, कालुसिंग सुकलाल पावरा, प्रविण गेंदाराम पावरा व इतर यांनी मिळून ही गांजाची लागवड केली आहे.
या छाप्यात पोलिसांनी ३४ लाख २ हजार रुपये किंमतीची ९७२ किलो वजनाची गांजाची झाडे पंचासमक्ष जप्त केली आहे. ताब्यातील दोन आरोपी व मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणला. पोकॉ मुकेश पावरा यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात थाळनेर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपींव्यतिरिक्त इतर आरोपी फरार असून, सदर गुन्ह्याचा तपास सपोनि शत्रूघ्न पाटील करत आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर सुनिल गोसावी, अति.कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि शत्रूघ्न पाटील, पोसई समाधान भाटेवाल, हर्षल पाटील, पोहकाँ भूषण रामोळे, रावसाहेब पाटील, पोकाँ उमाकांत वाघ, किरण सोनवणे, धनराज मालचे, मुकेश पावरा, रामकृष्ण बोरसे, योगेश पारधी, चापोकॉ दिलीप मोरे, होमगार्ड अनिल पावरा यांनी यशस्वी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here