छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर सुजित खंडाळे) । जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावातील बहुळा नदीवर पुल बांधकामाची मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र या मागणीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बुधवार (दि.२४) पासून सुरुवात केली आहे.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावातील बसस्टॅण्ड ते गावात जाण्यासाठी बहुळा नदीवर पूल बांधकामाची मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत तसेच वरिष्ठ शासकीय कार्यालये व लोकप्रतिनिधींकडे लेखी व तोंडी स्वरुपात करीत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने, गावातील शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. रुग्णवाहिका, शालेय बस व वाहतुकीची साधनांपासून वंचित गावकरी अखेर पुलाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.

या पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज (दि.२४) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर शांततापूर्ण बेमुदत उपोषणास सुरुवात केली असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन दिले असून, या निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग छत्रपती संभाजीनगर, तहसीलदार सिल्लोड, उपअभियंता सा.बां.उपविभाग सिल्लोड, उपअभियंता जि.प.बां.उपविभाग सिल्लोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन सिल्लोड, सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय आमठाणा यांना दिली आहे. निवेदनावर शरद प्रभाकर करडेल व गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







