यवतमाळ (प्रतिनिधी) । जिल्ह्यातील पुसद शहरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपाताची गोळी घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीवर बलात्कार करणाऱ्या शिकवणी शिक्षकाला अटक केली असून, तिला गर्भपाताची गोळी देणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी सुरू आहे.
पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी बारावीची विद्यार्थिनी होती आणि ती साडेचार महिन्यांची गर्भवती होती. बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांनी नांदेड येथील एका डॉक्टरशी संपर्क साधला, त्याने तिला गर्भपातासाठी काही गोळ्या दिल्या. मात्र, या गोळ्या घेतल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडली आणि तिला गंभीर रक्तस्राव सुरू झाला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी २८ वर्षीय शिकवणी शिक्षक संतोष गुंडेकर याला अटक केली आहे. संतोष गुंडेकरवर डिसेंबर २०२४ पासून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मृत्यूपूर्वी मुलीने दिलेला जबाब नोंदवून घेतला आहे. हा जबाब या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.
या प्रकरणात पोलिसांनी केवळ शिक्षकावरच कारवाई केली नाही, तर नांदेडच्या त्या डॉक्टरवरही लक्ष केंद्रित केले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्या डॉक्टरकडे गर्भपातासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर परवानग्या नव्हत्या. तरीही त्याने मुलीवर उपचार केले. सध्या डॉक्टरचीही सखोल चौकशी सुरू आहे.







