लाहोर (वृत्तसंस्था) । दहशतवादी तळ असल्याचे समजून पाकिस्तान एअर फोर्सने स्वत:च्या देशात रविवारी रात्री उशिरा सामान्य नागरिकांच्या घरांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ३० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. हा प्रकार खैबर पख्तुनख्वा प्रांतातील तिराह खोर्यातील मातरे डेरा गावात घडला.
रात्री साधारणत: दोन वाजता चिनी बनावटीच्या फायटर जेटस्ने गावावर ८ ‘एलएसए-६’ बॉम्ब टाकले. या बॉम्बहल्ल्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्राण गेले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानिक पत्रकारांनी व नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये ढिगार्यात पडलेले मृतदेह आढळले. त्यात काही लहान मुले असल्याचे स्पष्ट होते. घटनास्थळी बचाव पथके शोधकार्य करत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी मात्र ‘पाकिस्तानी तालिबान’ या दहशतवादी संघटनेच्या स्फोटकांचा साठा हलवताना हा स्फोट घडल्याचे म्हटले आहे. हा भाग दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असून, तेथे बॉम्ब बनवण्यात येत होते. मात्र, या स्फोटात महिला आणि लहान मुलांचे बळी गेल्याचे स्थानिक पोलिसप्रमुख जाफर खान यांनी सांगितले. ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने स्थानिक नागरिक, विरोधी नेते आणि पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात हवाई हल्ल्यात नागरिक ठार झाल्याचे म्हटले आहे.







