ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । अंमली पदार्थ विक्रेत्याला हटकल्यामुळे शाब्दिक वाद झाला. वादातून काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असून, या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विठ्ठलवाडी पोलिसांकडून सुरू आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वसीटा उल्हासनगर कॅम्प ४ मधील श्रीराम चौकाजवळील वसीटा कॉलनीत राहणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसीटा (वय वर्ष ७०) यांच्यावर अजय बागुल याने हा हल्ला केला आहे. अजय बागुल हा अंमली पदार्थ विक्रेता आहे. आरोपी बागुल या परिसरात नशेचे पदार्थ विकण्यासाठी येत असतो. मंगळवारीही तो अंमली पदार्थ विकण्यासाठी आला होता. वसीटा यांनी आरोपी बागुलला हटकले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. बागुलनं कंबरेला असलेला धारदार कोयता काढला व वसीटा यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वसीटा थोडक्यात बचावले.
या प्रकरणानंतर वसीटा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अजय बागुल विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिांसानी आरोपी बागुल विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ आणि धमकावणे या गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.







