जळगावात प्रदूषण नियंत्रण मंडळाचा क्षेत्र अधिकारी लाच घेतांना जेरबंद

लाचलुचपत
file photo

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकारी १५ हजार रुपयांची लाच मागून ती खाजगी पंटरच्या फोनपे अ‍ॅपवर स्वीकारताना जेरबंद झाला आहे. या कारवाईत आरोपी अधिकारी राजेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (४२, रा. नवआकाश सोसायटी, धात्रक फाटा, नाशिक) याला अटक करण्यात आली असून, खाजगी पंटर मनोज बापू गाजरे मात्र पसार झाला आहे. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, नाईक बाळू मराठे, शिपाई भूषण पाटील आदींच्या पथकाने केली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, रावेर येथील एका हॉस्पीटलमधील मॅनेजरने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. हॉस्पीटलच्या बायोवेस्ट संदर्भातील प्रमाणपत्रासाठी १६ मार्च रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला जळगाव कार्यालयात झालेल्या त्रुटींनंतर नाशिक कार्यालयातून २८ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र मिळाले. मात्र, जळगाव कार्यालयातील अर्ज मागे घेण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी तक्रारदार गेले असता, सूर्यवंशीने १५ हजारांची लाच मागितली. लाच न देण्याचा निर्णय घेतलेल्या तक्रारदाराने २३ सप्टेंबर रोजी जळगाव एसीबीकडे धाव घेतली. त्यानंतर पथकाने सापळा रचला. बुधवार, २४ सप्टेंबर रोजी खाजगी पंटर मनोज गाजरे याने फोनपे अ‍ॅपद्वारे रक्कम स्वीकारली. मात्र तो पसार झाला आणि अधिकारी सूर्यवंशीला अटक करण्यात आली. सदर आरोपीच्या कार्यालयात सापळा कारवाई दरम्यान त्याच्या हँडबॅग मध्ये २,२६,०००/- रुपये रोख रक्कम देखील मिळून आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here