जळगाव (संपादक सुनिल पाटील) । लखनऊ वरून मुंबई कडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस रेल्वेच्या एका स्लीपर कोचमध्ये आज दुपारी अचानक आग लागली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रवाशांची सतर्कता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची केलेली तातडीची कारवाई यामुळे मोठा अनर्थ टळला. भुसावळ रेल्वे स्थानकावरून जळगावकडे येत असताना भादली रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी जळगाव स्थानककडे येत असताना बोगी नंबर ४ च्या स्लीपर डब्यातील चाकाजवळ अचानक धूर येऊ लागला. धूर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहताच प्रवाशांनी तात्काळ ओरडून इतरांना सावध केले. या घटनेमुळे काही काळ गाडीत धावपळ उडाली. तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. यानंतर कर्मचाऱ्यांनी भादली स्थानकाजवळ गाडी थांबवून आग विझवण्याची मोहीम तात्काळ सुरु केली. अग्निशामक सिलिंडरच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, या बोगीच्या चाकाचा लायनर घासला गेल्याने, स्पार्क झाला आणि त्यातून आग लागली. रेल्वेच्या तंत्रज्ञांनी तातडीने तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. घटनेनंतर गाडीला काही वेळ थांबवून सुरक्षिततेची खात्री करण्यात आली असून, प्रवाशांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याने पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आला आहे.
मात्र या घटनेमुळे २० ते २५ मिनिटे गाडी भादली रेल्वे स्थानकानजीक थांबून होती. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे प्रवाशांनी दिलासा व्यक्त केला आहे.







