पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । दारुच्या नशेत अनेक नागरिकांना चिरडणार्या रांजणगाव पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल हेमंत इनामे याला अखेर पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, गुन्हा जामीनपात्र असल्याने अटकेची गरज नाही असे म्हणणार्या पोलिस खात्याने त्याला अटकही केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस कॉन्स्टेबल हेमंत इनामे हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीस उपस्थित होता, जिथे त्याने मोठ्या प्रमाणात मद्य सेवन केले व नशेतच त्याने कार चालवली आणि पुणे-नगर महामार्गावर गाडीवरील ताबा सुटल्याने सहा वाहनांना एकामागोमाग एक धडक दिली. अपघातात काहींना गंभीर दुखापत झाली असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर रांजणगाव पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल केला आहे, मात्र आरोपी कॉन्स्टेबलला ना अटक करण्यात आली आहे, ना त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दारूच्या नशेत जीवाशी खेळ करणार्या कॉन्स्टेबलवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती.
या घटनेतील जखमींमध्ये बावीस वर्षांच्या अभिषेक पवार या तरुणाचा समावेश आहे. अभिषेकचा डावा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्याच्या छातीला आणि पोटाला ही गंभीर जखमा झाल्या आहेत. पुण्यातील एका हॉस्पीटलमधे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.







