अपहरणप्रकरणी पाच जणांसह दोन अल्पवयीन मुलांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले जेरबंद

अपहरण

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । रस्ता विचारण्याच्या कारणावरून झालेल्या वादात मारहाण करून दोघांचे अपहरण करत, काही अंतरावर असलेल्या त्यांना जंगलात सोडून दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना जेरबंद केले आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी सदर घटना घडली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सुबोध मल्हारी कांबळे (रा. श्रीराम कॉलनी, आळंदी रोड, भोसरी), ओंकार संजय कांबळे (रा. दिघी), सूरज महादेव शिंदे (रा. भोसरी) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुदर्शन महादेव आडे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांचे मित्र हे रविवारी (ता. ३०) रात्री आळंदीतील चाकण चौक येथे थांबलेले असताना आरोपी तेथे आले. रस्ता विचारण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यातून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचे मित्र विकास अर्जुन सोनकांबळे, संतोष भाऊसाहेब हांबर्डे यांना मारहाण केली. त्यांच्याकडून ५०० रुपये व दोन मोबाईल काढून घेतले. तसेच छोट्या टेम्पोमधून सोनकांबळे आणि हांबर्डे यांना घेऊन गेले. त्यानंतर मारहाण करून आळंदीकडून चाकणकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलामध्ये सोडून दिले.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी सुबोध मल्हारी आळंदी येथील देहू फाटा येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या चार साथीदारांसह गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here